Ladki Bahin Yojana Portal Closed : मंडळी 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या गाजावाजासह सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सध्या अडचणीत सापडली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या योजनेचे पोर्टल बंद असल्यामुळे, अनेक पात्र महिलांना अद्यापही योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नाही का? असा संतप्त सवाल महिला वर्गातून विचारला जात आहे.
ही योजना जुलै 2024 पासून 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला दरमहा 1500 रुपये अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते. काही महिलांना याचा लाभ मिळालाही. परंतु जुलै 2024 नंतर ज्या महिलांनी वयाची 21 वर्षे पूर्ण केली, त्या महिलांना आजतागायत या योजनेत समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर, अनेक महिलांचे अर्ज तांत्रिक त्रुटींमुळे अडकल्याने त्यांनाही लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
सौर फवारणी पंपासाठी अर्ज करणे सुरु , असा करा ऑनलाईन अर्ज
महत्त्वाचे म्हणजे, या तांत्रिक अडचणींबाबत महिलांना कोणतेही स्पष्ट मार्गदर्शन मिळत नाही. पोर्टल बंद असल्यामुळे अर्जामधील चुका सुधारता येत नाहीत, तसेच नव्याने पात्र झालेल्या महिलांना अर्ज सादर करण्याची संधीही मिळत नाही.
सत्ताधारी महायुतीकडून हे मान्य केले जाते की लाडकी बहिण योजनेचा मोठा प्रभाव विधानसभा निवडणुकीत जाणवला होता. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही या महिलांचा सहभाग निर्णायक ठरू शकतो. मात्र त्याआधी सरकारने योजनेच्या पोर्टलची तातडीने पुनर्बहाली करून नव्याने पात्र झालेल्या महिलांचा समावेश करणे आवश्यक आहे. अन्यथा या दुर्लक्षाचे परिणाम सरकारला राजकीय पातळीवर भोगावे लागू शकतात.
राज्य सरकारची मोठी घोषणा : शेळ्या व मेंढ्या खरेदी योजना , ऑनलाईन अर्जप्रक्रिया सुरु
एकीकडे संविधानाने महिलांना 18 व्या वर्षी मतदानाचा अधिकार दिला आहे, तर दुसरीकडे लाडकी बहिण होण्यासाठी मात्र 21 व्या वर्षाची अट लावण्यात आली आहे. या वयावर आधारित भेदभावाचे पुनर्विचार करून 18 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांनाही या योजनेत समाविष्ट करणे योग्य ठरेल.
महत्वाच्या मागण्या
1) बंद असलेले पोर्टल तात्काळ सुरू करावे.
2) नव्याने 21 वर्षे पूर्ण झालेल्या महिलांचा समावेश करावा.
3) तांत्रिक त्रुटींमुळे लाभ न मिळालेल्या महिलांना मार्गदर्शन व लाभ द्यावा.
4) वयोमर्यादा 21 वरून 18 वर्षांपर्यंत खाली आणण्याचा विचार करावा.
राजकीय लाभासाठी सुरू केलेली ही योजना आता टिकवण्याची वेळ आली आहे. अन्यथा, लाडक्या बहिणींच्या नाराजीचे पडसाद भविष्यातील निवडणुकांमध्ये उमटल्याशिवाय राहणार नाहीत.
